कर्मवीर दादासाहेब सबलीकरण योजनेस जमीन देवू इच्छिणाऱ्यांनी अर्ज सादर करावेत : सहायक आयुक्त अर्जुन बन्ने
सांगली : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी दिनांक 14 ऑगस्ट 2018 च्या शासन निर्णयानुसार सुधारीत कर्मवीर दादासाहेब सबलीकरण योजना दिनांक 15 ऑगस्ट 2018 पासून सुरू करण्यात आली आहे. सुधारीत योजनेनुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटूंबांना 4 एकर जिरायत (कोरडवाहू) जमीन किंवा 2 एकर बागायत (ओलीताखाली) जमीन 100 टक्के शासकीय अनुदानाव्दारे उपलब्ध करून देण्यात येते. जिल्ह्यातील जे जमीन मालक रेडीरेकनरनुसार किंवा जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेल्या दरानुसार या योजनेस जमीन देवू इच्छितात त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली येथे सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त अर्जुन बन्ने यांनी केले आहे.
शासन अनुदानाची कमाल मर्यादा रेडिरेकनरनुसार किंमत अथवा जिरायत जमिनीकरीता 5 लाख रूपये प्रति एकर तर बागायत जमिनीकरीता 8 लाख रूपये प्रति एकर यापैकी जी कमी असेल ती राहील. तसेच ज्या गावात जमिन उपलब्ध आहे त्याच गावातील लाभार्थ्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग शासन निर्णय क्रमांक जमीन -2015/प्र.क्र.64/अजाक दि. 14 ऑगस्ट 2018 https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2374739 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. बन्ने यांनी केले आहे.